नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पश्चिम बंगालमध्ये यशवंत सिन्हा यांनी माझ्या माहितीप्रमाणे भाजपा २९४ पैकी ३०० जागा जिंकणार असल्याचं उपरोधिक ट्विट केलं आहे.
सत्ता यावी यासाठी भाजपाची जोरदार प्रयत्न केले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वत: मैदानात उतरुन प्रचार करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. यावेळी पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला २०० हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान भाजपातून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणारे यशवंत सिन्हा यांनी यावरुन अमित शाह यांना उपरोधिक टोला लगावला आहे.
सिन्हा म्हणाले आहेत की, “बंगाल निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपा ३० पैकी फक्त २६ जागांवर विजय मिळवण्याचा दावा केल्याबद्दल आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभारी आहोत. माझ्या माहितीप्रमाणे भाजपा संपूर्ण ३० आणि २९४ पैकी ३०० जागांवर विजय मिळवणार आहे”.
शनिवारी पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पहिल्या टप्प्यात मतदान शांततेत पार पडले. यानंतर अमित शाह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, “कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बंगालमध्ये भाजपाची भगवी लाट आल्याचे संकेत मिळाले. पहिल्या टप्प्यात तिथे ३६ जागांवर मतदान झाले. त्यापैकी २६ जागा भाजपाला मिळेल आणि इतर टप्प्यात २९४ सदस्यीय पश्चिम बंगालमध्ये भाजपला २०० हून अधिक जागा मिळतील”.