पदोन्नतीतील आरक्षणासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा — नितीन राऊत

 

मुंबई:  वृत्तसंस्था । पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा. मीही या मोर्चात सहभागी होईल, असं आवाहन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेसच्या अनुसूचित जाती, जमाती सेलच्या कार्यकर्त्यांना केलं.

 

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काहीच निर्णय घेतला जात नाही. मंत्रालयातील काही झारीतील शुक्राचार्य कुणाच्या तरी दबावाखाली येऊन ही अडवणूक करत आहेत. असेही राऊत म्हणाले .   या निमित्ताने महाविकास आघाडीतली काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील धुसफूसही चव्हाट्यावर आली आहे.

 

महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने  सोमवारी बैठकीचे आयोजन केले होते. दुरदृश्य प्रणालीवर ही बैठक झाली होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पदोन्नतीतील आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी नितीन राऊत यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केलं. ओबीसींच्या प्रश्नांवर मंत्री उपसमिती बनते. त्याच्या अध्यक्षपदी ओबीसी मंत्र्याला नियुक्त केले जाते. मराठा आरक्षण विषयावर उपसमितीच्या अध्यक्षपदी मराठा मंत्र्याची वर्णी लागते. मात्र पदोन्नतीच्या विषयावरील उपसमितीचे अध्यक्ष दलित मागासमधील मंत्र्यास न करता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेमण्यात आले, असे का?, असा सवाल राऊत यांनी विचारला.

 

अजित पवार यांच्या या समितीने भाजप सरकारने काढलेल्या 29 डिसेंबर 2017 चा जीआर रद्द करण्याची शिफारस करूनही अपेक्षित निर्णय झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयात  आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आकडेवारी गोळा करण्याकरीता सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे ठरले होते. मात्र या नियुक्तीचा जीआर अद्यापही निघालेला नाही. मंत्रालयातील झारीतील शुक्राचार्य कुणाच्या तरी दबावाखाली येऊन ही अडवणूक करीत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर अनुसूचित जाती प्रदेश काँग्रेसने आक्रमक आंदोलन केल्यास वा उपसमिती अध्यक्षाच्या घरासमोर निदर्शने करायचे ठरविल्यास आपण स्वतः या आंदोलनात सामील होऊ, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

 

या बैठकीला काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष व आमदार प्रणिती शिंदे, आमदार राजू पारवे, लहू कानडे आणि राजेश राठोड यांच्यासह अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विजय अंभोरे, कार्याध्यक्ष गौतम अरकडे उपस्थित होते. कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे यांनी या बैठकीचे संचालन केले.

 

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. मागासवर्गीयांच्या आरक्षणातील पदोन्नतीच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांच्या सारखा मंत्री असूनही पदोन्नतीचा तिढा सुटत नाही. त्यामुळे दलित समाजात प्रचंड नाराजी आहे. या समितीचं अध्यक्षपद दलित मंत्र्याकडे देण्याऐवजी पवारांकडे देण्यात आल्याने दलित समाजात अस्वस्थता असतानाच आरक्षणातील पदोन्नतीवर अद्यापही निर्णय होत नसल्याने आगीत तेल ओतण्याचा प्रकार झाला आहे. त्यामुळेच राऊत यांनी थेट अजित पवारांच्या घरावरच मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. येणाऱ्या काळात पवार विरुद्ध राऊत असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीत एकत्र असली तरी त्यांच्यात धुसफूस सुरू असल्याचंही दिसून येत आहे. राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत वाढती जवळीक काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळेही या दोन्ही पक्षामध्ये वादाची ठिणगी पडत असल्याचं सूत्रांनी सांगितलं

Protected Content