नवी दिल्ली : वृत्तसंस्था । गेल्या २४ तासात देशात ४० हजार ९५३ नवे कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या चार महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. २३ हजार ६५३ जण उपचारानंतर बरे झाले असून १८८ मृत्यूंची नोंद झाली आहे.
देशात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा चिंता सतावू लागली आहे. अनेक राज्यांनी नव्याने निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनचा पर्याय निवडण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे.
देशात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १ कोटी १५ लाख ५५ हजार ३८४ इतकी झाली असून १ कोटी ११ लाख ७ हजार ३३२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या देशात २ लाख ८८ हजार ३९४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मृतांची संख्या १ लाख ५९ हजार ५५८ इतकी आहे. देशभरात आतापर्यंत ४ कोटी २० लाख ६३ हजार ३९२ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
भारतात सलग तिसऱ्या दिवशी ३० हजारांहून अधिक बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी नोंद झालेल्या ३९ हजार ७२६ रुग्णांच्या तुलनेत शनिवारी चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात गेल्या आठवड्यापासून दिवसाला २० हजाराहून जास्त रुग्ण आढळत आहेत. एकूण आकडेवारीत महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगड यांचा ८०.६३ टक्के वाटा आहे.