चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील बहुतांश तांड्याची स्थिती अतिशय बिकट आहे. हे तांडे प्राथमिक सोयी सुविधांपासून वंचित असल्याचे भयावह चित्र आहे. याबाबत आमदार निलय नाईक यांना कळले असता त्यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून चाळीसगावच्या तांडा वस्तींच्या विकासकामांसाठी २१ लाखांचा निधी मंजूर करून त्याबाबतचा पत्रही सुपूर्द केले आहे.
वसंतराव नाईक यांचे वंशज व यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदार संघाचे विद्यमान आमदार निलय नाईक यांनी स्थानिक विकास निधीतून चाळीसगावच्या तांडाच्या विकासकामांसाठी २१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. तत्पूर्वी आ. निलय नाईक यांनी तालुक्यातील तांड्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून संवाद साधण्यात आला. लगेच त्यांनी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वस्तीला विकासकामांसाठी मदत करण्याची भूमिका दर्शवली. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे आपल्या निवासस्थानी बोलावून २१ लाखांचा निधीस मंजुरी दिली व तशा प्रकारचे पत्र यावेळी त्यांनी दिले. याप्रसंगी २१ लाखांचे पत्र स्विकारताना जिल्हा परिषद सदस्य अमाजी नाईक, विजा भजाचे तालुका उपाध्यक्ष विनित राठोड व सांगवी ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश राठोड आदी उपस्थित होते.