

धरणगाव (प्रतिनिधी) आज दुपारपासून धरणगावमधील सोशल मीडियात राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात असल्याची पोस्ट व्हायरल व्हायला लागल्यानंतर चर्चेला उधान आले होते. दरम्यान, या संदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड.संजय महाजन यांनी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते संपर्कात असल्याच्या वृत्ताला दुजोरा देत खळबळ उडवून दिली आहे.

या संदर्भात अधिक असे की, धरणगाव शहरातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी सध्या नाराज असल्याचे वृत्त आहे.सोशल मिडियात टाकलेल्या पोस्टमध्ये गुलाबराव देवकर कारागुहात असतांना गतविधानसभेला ज्यांनी खिंड लढवली. धरणगावातून मताधिक्क्य दिले. तेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आज अडगळीत टाकल्याचा आरोप केला गेलाय. एवढेच नव्हे तर, मंत्री,संकटमोचक अशा सूचक शब्दात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याचे देखील म्हटले आहे. त्यामुळे काही व्हाटसअप ग्रुपवर या विषयावर चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादीच्या समर्थकांनी या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. तसेच हे लोकांची दिशाभूल करण्यासाठी सोशल मिडिया वॉर खेळले जात असल्याचे देखील काहींचे म्हणणे आहे.
दरम्यान, या संदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड.संजय महाजन यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी सोशल मिडियावर सुरु असलेल्या चर्चेत तथ्य असल्याचे कबूल केले. तर धरणगाव शहरच नव्हे तर, ग्रामीण भागातून देखील अनेक राष्ट्रावादी,कॉंग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. तूर्त याविषयावर अधिक बोलता येणार नाही. परंतु सोशल मिडियात रंगलेल्या चर्चेला पूर्णपणे नाकारता येणार नाही. देश आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यासह आपल्या तालुक्यातील मंडळी देखील भाजपात येण्यास उत्सुक आहेत. श्री.महाजन यांच्या सूचक वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली असून चर्चेला उधान आले आहे.


