जळगाव, प्रतिनिधी । शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या दाणा बाजारात वाहनांना येण्यासाठी सकाळी १० च्या पुर्वी आणि सायंकाळी ५ नंतर अशी वेळ निर्धारित केली आहे. तरीदेखील नियमांचे उल्लंघन करुन वाहतूक केली जात असल्याचे उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पाहणीत आढळून आले आहे. यानुसार दुपारी १ वाजेच्या सुमारास संबंधित ट्रान्सपोर्टचे कार्यालय सील करण्यात येवून माल उतरवत असतांना दोन ट्रक जप्त करण्यात आली आहेत.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दाणा बाजारात मोठी गर्दी होते. दिवसभर त्या ठिकाणी शंभरच्यावर ट्रक्स् किंवा मालवाहू वाहने उभी असतात, परिणामी त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होती. त्यामुळे दाणाबाजारात मालवाहू ट्रकला लोड-अनलोड करण्यासाठी सकाळी १०च्या पुर्वी तर सायंकाळी ५ च्या नंतर अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. याबाबत महापालिकेच्या महासभेत ठरावदेखील मंजूर करण्यात आला आहे. तरीदेखील दाणाबाजारात नियमांचे पालन केले जात नसल्याने उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह पथकाने दुपारी दाणाबाजारात पाहणी केली. दरम्यान या ठिकाणी जवळपास १०० मालवाहू वाहने उभे असलेली दिसून आली. तर दोन मालवाहू वाहनांमध्ये माल उतरवत असल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरणारे दोन मालवाहू ट्रक जप्त करण्यात आले आहे.
दाणाबाजारात मालवाहू ट्रकसाठी निर्धारित वेळ निश्चित केली आहे. निश्चित केलेल्या वेळेतच माल लोड-अनलोड करण्याबाबत उपायुक्त वाहुळे यांनी दाणाबाजारातील ट्रान्सपोर्ट कार्यालयास दोन ते तीन वेळा सूचना दिल्या होत्या. तरीदेखील सूचनांचे पालन न केल्यामुळे आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे येथील ट्रान्सपोर्ट कार्यालय सीलची कारवाई करण्यात आली आहे. उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय ठाकूर, नाना कोळी, नितीन भालेराव, किशोर सपकाळे यांच्यासह पथकानेही कारवाई केली.