अमळनेर प्रतिनिधी । चालकाला मारहाण करून ट्रक पळवून नेणार्या दोघांना न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत वृत्त असे की, बोरकुंड ( जिल्हाधुळे) येथील गोपाळ गोकुळ बनकर हे १३ जानेवारी २०१८ रोजी दुपारी साडेतीन वाजता पारोळ्याहून साहित्य भरून बोरकुंड येथे ४०७ वाहन (एमएच- १८, एए- ९५४२)ने जात होते. पारोळ्याहून काही किलोमीटर अंतर गेल्यावर समोरून येणार्या ट्रक (एमएच- १९, एई- ९७८६) ही रस्त्यात आडवी केली होती. त्यामुळे ४०७ वाहन थांबले. यानंतर ट्रकमधील दोघांनी चालक गोपाळ बनकरला ढकलून त्यांच्या डोक्यावर टॅमी मारली. त्यांना सीट खाली दाबून त्यांच्याकडून १२०० रुपयांचा मोबाइल हिसकावून घेतला. तर गाडी पारोळ्याकडे वळवून पळून गेले.
मात्र, त्यातील एकाला गाडी व्यवस्थीत चालवता येत नसून हे वाहन मोंढाळे हायस्कूलजवळ कंपाऊडला आदळले. यानंतर हे दोघेही पळून गेले. तर गोपाळवर उपचार केल्यानंतर पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. तपास अजितसिंग देवरे यांनी केला. दरम्यान, हा खटला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. तर यातील आरोपी सुनील भाऊराव बोरसे व अन्वरखान नसिरखान पठाण हे धुळे कारागृहात होते. या प्रकरणात सरकारी वकील अॅड. किशोर बागुल यांनी १० साक्षीदार तपासले. न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी साक्ष ग्राह्य धरत दोन्ही आरोपींना ७ वर्षांची शिक्षा व प्रत्येकी १० हजारांचा दंड फिर्यादीला देण्याची शिक्षा सुनावली.
या गुन्ह्यातील आरोपी धुळ्यातील हजाराबस्ती अलहेरा येथील अन्वरखान नसिरखान पठाण (मूळ रा. उंदिरखेडा, ता. पारोळा) व धुळ्यातील मोहाडी नगरमधील सुनील भाऊराव बोरसे हे सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांनी शिरपूर, शिंदखेडा, धुळे, नवापूर, पारोळा येथे ७ तर चाळीसगाव येथे ८ गुन्हे केले होते.