जळगाव, प्रतिनिधी । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती यामुळे स्वराज्य निर्मितीचा पाया उभा राहिला. एखादी मोहीम आखल्यानंतर गड उतार झाल्यापासून ते पुन्हा गडावर येईपर्यंत कशी कामे करायची, याचे व्यवस्थापन चोख असायचे असे प्रतिपादन प्राचार्य साहेबराव भुकन यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी सानेगुरुजी विद्याप्रबोधनीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, खिरोदा येथील प्राचार्य साहेबराव भुकन यांनी पुढे सांगितले की, नियोजन करणे, माहिती गोळा करणे, जबाबदाऱ्या निश्चित करणे, यामुळे शिवाजी महाराजांना मोठे यश मिळाले. जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची स्थापना केली असे स्पष्ट केले. यावेळी प्राचार्य ए. आर. राणे, उपप्राचार्य प्रा. केतन चौधरी, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. संदीप केदार, एम. एम. वनकर, मोहन चौधरी, केतन पाटील आदी उपस्थित होते.