अमळनेर प्रतिनिधी । येथील अवैध फलक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी स्वत: पोलीसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांची तक्रार न घेतल्याने ते बेपत्ता झाले आहेत. तर त्यांची कार चोपडा येथे आढळून आली आहे.
याबाबत वृत्त असे की, मंगळवारी रात्री पालिका पथकाशी अनधिकृत होर्डिंग काढण्यावरून वाद झाले होते. यातील होर्डिंग्ज काढणारे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यानंतर बुधवारी त्यांनी अमळनेर पोलिस ठाणे गाठून होर्डिंग्ज प्रकरणी स्वत: तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी ती दाखल करून घेतली नाही. यामुळे उपमुख्याधिकारी गायकवाड यांनी पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांना माहिती दिली. यानंतर बुधवारपासून ते बेपत्ता झाले. यानंतर त्यांनी गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास होर्डिंग्ज प्रकरणी उद्विग्न होत स्वत: जाळून घेत आत्महत्या करणार असल्याची माहिती देणारा व्हिडिओ व्हायरल केला.
गायकवाड हे पोस्ट व्हायरल केल्यानंतर चोपडा येथे गेले आहेत. त्यांना पैशांची आवश्यकता होती. चोपड्यामध्ये एका मित्राकडे त्यांनी कार लावली होती. लासूर येथील एका मित्राला त्यांनी फोन लावून १० हजार रुपये उधार मागितले. यानंतर मात्र ते आढळून आले नाहीत. यामुळे खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी आता अमळनेरात नगरसेवकासह २५ जणांविरूध्द शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.