जळगाव प्रतिनिधी । अवैध सावकारीच्या माध्यमातून जमीनी हडप करण्याच्या प्रकरणात सहाय्यक उपनिबंधकांच्या निर्देशानुसार नेमण्यात आलेल्या पथकांनी जळगाव, एरंडोल आणि कासोदा येथे छापे टाकले आहेत.
सहायक उपनिबंधकांच्या तीन पथकांनी मंगळवारी अवैध सावकारी करणार्या कुटुंबियांच्या जळगाव व कासोदा येथील निवासस्थानांसह एरंडोलमधील दुकानावर छापा टाकला. या कारवाईत गहाणखत, कोरे प्रतिज्ञापत्र, खरेदीखताची आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहे.
एरंडोल येथील संजय आत्माराम चौधरी, श्यामलाल जमनालाल सुतार (रा. कासोदा), उज्ज्वला संजय चौधरी (रा. एरंडोल), कमलाबाई दयाराम चौधरी व दयाराम सखाराम चौधरी (रा. बांभोरी, ता.धरणगाव) या पाच शेतकर्यांना बियाणी कुटुंबीयांनी अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैसे देऊन त्या बदल्यात जमिनी हडप केल्याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे श्रीराम गणपती बियाणी, सपना शैलेश बियाणी व शैलेश श्रीराम बियाणी (रा. कासोदा, ता. एरंडोल) यांच्या विरूध्द तक्रारी दाखल केल्या होत्या.
दरम्यान, जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिलेल्या निर्देशानुसार अमळनेरचे सहायक निबंधक जी.एच. पाटील, एरंडोलचे सहायक निबंधक के. पी. पाटील, जळगावचे सहायक निबंधक विलास गावडे व प्रत्येकी पाच कर्मचार्यांच्या तीन पथकांनी मंगळवारी बियाणी कुटुंबीयांच्या कासोदा येथील निवासस्थान, एरंडोल येथील दुकान व जळगावातील शाहूनगरातील दत्त कॉलनीतील निवासस्थानी छापे टाकले. यात जप्त कागदपत्रांचा अहवाल उपनिबंधक कार्यालयाला सादर केलेला आहे.
दरम्यान, याप्रकरणी शैलेश बियाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमचा या गोष्टीशी काहीही संबंध नल्याचे सांगितले.