जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या परिक्षेची तयारी सुरू करण्यात आली असून याला २ मार्चपासून प्रारंभ होणार आहे.
पदवी व पदविका स्तरावरील प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान, प्रथम वर्ष समाजकार्य, पदवीस्तरावरील व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम, डीपीए, बीएएमसीजे, बीपीई, बीव्होक या अभ्यासक्रमांच्या परीक्षा, विधी अभ्यासक्रमाच्या एलएलबी आणि एलएलएमच्या सत्र १ वगळता इतर परीक्षा २ मार्चपासून घेतल्या जाणार आहेत. या सर्व परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
या परीक्षांसाठी परीक्षार्थींना स्मार्टफोन, लॅपटॉप, डेस्कटॉप (वेब कॅमेरासह) वर परीक्षा देता येईल. पदवीस्तरासाठी परीक्षेला ९० मिनिटांचा कालावधी राहील. ज्या विषयांच्या प्रश्नपत्रिकेत ६० प्रश्न असतील त्या पैकी ४० प्रश्न सोडवायचे आहेत. तर ज्या प्रश्नपत्रिकेत ४० प्रश्न असतील त्यापैकी ३० प्रश्न आणि ज्या प्रश्नपत्रिकेत ३० प्रश्न असतील त्यापैकी कोणतेही २० प्रश्न सोडवायचे आहे. या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत लागू राहणार नाही.
ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइनसाठी स्मार्टफोन, लॅपटॉप, डेस्कटॉप उपलब्ध नसेल त्यांनी नातेवाइक, मित्र वा इतर माध्यमातून ही साधने उपलब्ध करून घ्यावीत. सदर साधने उपलब्ध होत नसल्यास महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना ही साधने उपलब्ध करून द्यावीत. ज्यामुळे एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही.
ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यूजर मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या या निर्णयानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी सर्व महाविद्यालयांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. यात परीक्षेचे नियोजन काटेकोरपणे करण्याच्या सूचना दिल्या आहे.