सौरव गांगुली पुन्हा रुग्णालयात

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. रात्रीपासून त्याला अस्वस्थ वाटत होतं.

बुधवारी दुपारी त्याच्या छातीत थोडं दुखू लागलं. प्रकृती बिघडल्याने कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात गांगुलीला दाखल करण्यात आलं आहे.

सौरव गांगुलीला २ जानेवारीला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली होती. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर ७ जानेवारीला गांगुलीला डिस्चार्ज देण्यात आला होता. प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याने त्यांच्यावर होणारी अ‍ॅन्जिओप्लास्टी पुढे ढकलण्यात आली होती.

“गांगुलीला हृदयाच्या त्रासामुळे वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. व्यायाम करत असताना त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. त्यानंतर त्याच्या वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यात त्याला हृदयाचा विकार असल्याचे निष्पन्न झालं. डॉ. सरोज मोंडल यांच्यासह तीन डॉक्टरांची टीम गांगुलीवर उपचार करत आहे”, अशी माहिती ज्येष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मजुमदार यांनी दिली होती.

भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीची ओळख आहे. २००३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने १९८३ नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नॅटवेस्ट सीरिजमध्ये भारताने धोबीपछाड दिला होता. त्या विजयानंतर लॉर्ड्सच्या गॅलरीत गांगुलीने टी-शर्ट काढून फिरवलेला साऱ्यांच्या आजही लक्षात आहे बीसीसीआय अध्यक्ष झाल्यानंतरही गांगुलीने अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. कोरोना संकटातही आयपीएलचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्यात गांगुलीचा मोलाचा वाटा होता.

Protected Content