वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेचं संरक्षण कार्यालय असलेल्या पँटॉगॉनने मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्यासाठी एक अब्ज डॉलर मंजूर केले आहेत. मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधणं ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी याबद्दलचं आश्वासन दिलं होतं. संसदेनं भिंत उभारणीसाठी निधी मंजूर न केल्यानं काही दिवसांपूर्वी अमेरिकेत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. विरोधकांनी यावरुन ट्रम्प सरकारला कोंडीत पकडल्यानं सर्वच खर्चांना मिळणारी मंजुरी रखडली होती. त्यामुळे देशभरातील कर्मचाऱ्यांचे वेतनही थकले होते.
अमेरिकेच्या संरक्षण कार्यालयाचे प्रमुख असलेल्या पॅट्रिक शानाहान यांनी मेक्सिकोच्या सीमेवरील भिंतासाठी एक अब्ज डॉलर देण्यास मंजुरी दिली. अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर ९२ किलोमीटरची भिंत उभारली जाणार आहे. ही भिंत ५.५ मीटर उंच असेल. सीमेवर भिंत उभारली जात असताना या भागातील रस्ते सुधारले जातील. याशिवाय पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात येईल.
‘आर्मी कोअर ऑफ इंजिनियर्सच्या कमांडरना सुरक्षा, सीमाशुल्क विभागाच्या मदतीसाठी एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर करण्यात आला आहे,’ अशी माहिती पँटॉगॉननं प्रसिद्धीपत्रातून देण्यात आली आहे. ‘संघराज्य कायद्यानुसार सीमेवर भिंत उभारली जाऊ शकते. संरक्षण मंत्रालयाला तसा अधिकार आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरील अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे,’ असे शानाहान यांनी म्हटलं आहे.