दिल्लीतील हिंसाचारावरून शेलारांचा पवार-राऊतांवर हल्लाबोल

 

मुंबई : प्रतिनिधी । महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीतील माथेफिरूंचे समर्थन केले असल्याचा आरोप करत भाजप नेते आशिष शेलार यांनी आज जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी शरद पवार व संजय राऊत यांना लक्ष्य करत जोरदार हल्लाबोल केला.

दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनी आयोजीत केलेल्या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचाराने खळबळ उडाली असून यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी यावरून भाजपवर कालच जोरदार टीका केली होती. याला आज भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले .

याप्रसंगी शेलार म्हणाले की, दिल्लीच्या घटनेत पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्यात आला. त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यांनी हे प्रकार केले त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील नेत्यांनी एक चकार शब्द काढला नाही. ‘महाष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दिल्ली आंदोलनाच्या हिसेंचं समर्थन करत आहेत. ज्यांनी या आंदोलनात हिंसा केली त्यांच्याविरोधात यांनी एक चकार शब्द काढला नाही. मात्र महाविकासआघाडीमधील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन केलं गेलं. अरे कुठे फेडाल ही पापं…?’, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

शिवसेनेच्या भूमिकेवरही शेलार यांनी निशाणा साधला. “रोज वचवच करणारे संजय राऊत आज देशातील पोलिसांच्या बाजूनं का बोलले नाहीत?”, अशी तोफ शेलार यांनी डागली आहे. तर जवान आणि पोलिसांच्या बाजूनं शरद पवार यांची सोशल मीडिया पोस्ट का आली नाही?, असा सवालही शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.

Protected Content