मुंबई: वृत्तसंस्था । बलात्कार आरोपाने अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांना भाजपने घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण राष्ट्रवादीने मुंडेंचा उल्लेख ओबीसी नेते असा करून भाजपचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भाजपला मुंडेंविरोधातील धार बोथट करावी लागेल, असे समजले जात आहे .
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. भाजप ओबीसी समाजाच्या नेत्यांमागे उभी राहत नाही, मात्र राष्ट्रवादी मुंडे यांचा या प्रकरणात दोष नसेल तर पाठीमागे ताकदीनिशी उभा राहील, असं वक्तव्य पाटील यांन केलं होतं. एबीपी माझाशी बोलताना पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य करून पाटील यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचं काम केलं आहे. भाजप नेते ओबीसींचा केवळ मतांसाठीच वापर करत असल्याचं सांगतानाच भाजप ओबीसीविरोधी आहे, हे सूचवण्याचा प्रयत्नही पाटील यांनी या निमित्ताने केला आहे.
भाजपने तीन बड्या ओबीसी नेत्यांना वाऱ्यावर सोडल्याचा जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामागचा हेतू आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्येच होते. खडसे हे ओबीसी आहेत. सत्ता आल्यानंतर त्यांनी बहुजन मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी केली होती. तेव्हापासून त्यांना भाजपने अडगळीत टाकण्यास सुरुवात केली होती. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांचा राजीनामा घेऊन त्यांचा पत्ता कापण्यात आला. त्यानंतर निवडणुकीत त्यांचं तिकीट कापून त्यांना विजनवासात पाठवण्यात आलं. भाजपला वाढवण्याचं योगदान देणाऱ्या खडसेंवरच भाजपने पक्ष सोडण्याची वेळ आणून सोडली.
दुसऱ्या ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनीही मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं होतं. या विधानानंतर त्यांच्याही राजकीय कारकिर्दीला उतरता कळा लागली. त्यांच्यामागे चिक्की घोटाळ्याचा ससेमिरा लागला. विधानसभान निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानतंर त्यांना विधानपरिषदही देऊ केली नाही. एवढेच नव्हे तर त्यांना भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवरही स्थान देण्यात आलं नाही. त्यांची केंद्राच्या कार्यकारिणीवर वर्णी लावून राज्याच्या राजकारणातून एकप्रकारे बेदखल करण्याचाच प्रयत्न करण्यात आला. तर चंद्रशेखर बावनकुळे या ओबीसी नेत्याचाही निवडणुकीतून पत्ता कट करण्यात आला होता. त्यापार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
भाजप ओबीसींना वाऱ्यावर सोडते पण आम्ही ओबीसींच्या पाठी उभे राहतो, असं सांगून मुंडेंच्या निमित्ताने ओबीसींना जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुंडे यांना मानणारा राज्यात मोठा वर्ग आहे. तसेच ते ओबीसींचा चेहरा आहेत. खडसेही राष्ट्रवादीवासी झाल्याने राष्ट्रवादीला ओबीसींची फळी मजबूत करायची आहे. त्यामुळेच खडसे असो की मुंडे या ओबीसी नेत्यांच्या पाठी भाजप नव्हे तर राष्ट्रवादीच उभी राहते असे सूचवून पाटील यांनी ओबीसींना योग्य ते संकेत दिले आहेत. आगामी काळात भाजपच्या सोबत जायचं की राष्ट्रवादीच्या? हे तुम्हीच ठरवा असंही त्यांना सूचवायचं आहे. मुंडेंवर झालेले आरोप आणि खडसेंच्या पाठी लागलेली ईडी या पार्श्वभूमीवर आता ओबीसींचीच एकजूट करण्यावर राष्ट्रवादीचा भर असेल, असं सूत्रांनी सांगितलं.