धनंजय मुंडे यांच्यावरील माझे आरोप कुठल्याही राजकारणाचा भाग नाहीत — रेणू शर्मा

मुंबई : वृत्तसंस्था । सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या महिला रेणू शर्मा यांनी आज सांगितले की, “मी धनंजय मुंडेच्या पक्षाचा, त्यांच्या पदाचा कधीही, कुठेही उल्लेख केला नाही. यात काहीच राजकारण नाही. मला कुणाचेही राजकीय करिअर खराब करायचे नाही.”

रेणू शर्मा म्हणाल्या की, “माझ्यासोबत २००९ आणि त्यानंतर २०१३ मध्ये वारंवार जबरदस्ती करण्यात आली. मला खोटी आश्वासने देवून मुंबईत आणलं गेलं. माझे करिअर घडवणार, लग्न करणार असे आमिष दाखवण्यात आले. मुंबईतदेखील विविध ठिकाणी माझ्यासोबत संबध ठेवले गेले. अनेकदा मला व्हिडीओची धमकी देवून शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आज मी रस्त्यावर आले आहे”.

“मी अनेक मार्गाने माझ्या बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र धनंजय मुंडेंनी तसे काही नसल्याचे बहिणीला भासवले. मी कुठेही धनंजय मुंडेच्या पक्षाचा, पदाचा उल्लेख केला नाही, यात काहीच राजकारण नाही. मला कुणाचेही राजकीय करिअर खराब करायचे नाही”.

रेणू शर्मा म्हणाल्या की, “कृष्णा हेगडे, मनिष धुरी हे दोघे धनंजय मुंडे यांना राजकीय मित्र म्हणून मदत करत असतील. परंतु मी कृष्णा हेगडेंचा आदर करते, ते माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतात हे मला माहीत नाही. मी मनिष धुरी यांना माझ्या अडकलेल्या अल्बम संदर्भात भेटले होते. त्यानंतर ते मला दारु पिऊन कॉल करायचे”.

“ब्लॅकमेल हा एक शब्द घेवून माझ्यावर आरोप केले जात आहेत, जे चुकीचे आहेत. मी तक्रार केल्यानंतर मला धमकीचे अनेक फोन येत आहेत. एक सामान्य व्यक्ती म्हणून मला यंत्रणेने सहकार्य करावे.”

दरम्यान, रेणू शर्मा आज डी. एन. नगर पोलीस ठाण्यातील एसीपींच्या कार्यलयात पोहचल्या. तिथे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. यापूर्वीदेखील त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. मात्र, जबाब अपूर्ण राहिल्याने आज त्यांना पुन्हा बोलवण्यात आलं आहे. एसीपी ज्योत्स्ना रासम यांनी स्वतः रेणू शर्मा यांचा जबाब नोंदवून घेतला.

भाजपचे माजी मंत्री कृष्णा हेगडे, मनसे नेते मनिष धुरी आणि विमान कंपनीतील अधिकारी रिझवान शेख यांनी रेणू विरोधात तक्रार केल्याने रेणू शर्मा गोत्यात आल्या होत्या. त्यामुळे रेणू या मुंडें यांना ब्लॅकमेल करत असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या.

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या. असं असलं तरी रेणू शर्मा यांच्याविरोधातही तक्रारी वाढत असल्याने हे प्रकरण रेणू शर्मांवरच बूमरॅंग होताना दिसत आहे. कारण रेणू शर्मा यांच्याविरोधात खुद्द धनंजय मुंडे यांनी तर तक्रार केली आहेच, पण त्यांच्याविरोधात इतर तीन तक्रारीही दाखल झाल्या आहेत. जर केवळ धनंजय मुंडे यांचीच तक्रार असती तर एकमेकांविरोधात तक्रार असं समजून प्रकरणाला तितकंस गांभीर्य आलं नसतं. पण अन्य तीन तक्रारी, त्याही बड्या नेत्यांच्या तक्रारी असल्याने प्रकरण आणखी गंभीर बनलंय.

 

Protected Content