मॉस्को : वृत्तसंस्था । संपूर्ण जगात गेले वर्ष कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सामना करता करताच संपलं. मोठ्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्या. मात्र, या जागतिक संकटाच्या काळातही रशियाने विक्रमी सोने खरेदी करून जे साध्य केलंय ते त्यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या अमेरिकेलाही शक्य झालेलं नाही
पहिल्यांदाच २०२० मध्ये अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रशियाकडील सोन्याचा साठा विक्रमी स्तरावर वाढलाय. सध्या रशियाकडे जवळपास ५८३ बिलियन डॉलर किमतीचा सोन्याचा साठा आहे. पुतिन अनेक वर्षांपासून अमेरिकेवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी मोहिम राबवत होते. याच मोहिमेला आत्ता यश येत असल्याचं दिसतंय.
रशियाच्या सेंट्रल बँकेने नुकतीच आकडेवारी जाहीर केली. यानुसार जून २०२० पर्यंत रशियाकडील सोन्याचा साठा २३ टक्क्यांपर्यंत वाढलेला होता. जून २०२० पर्यंत रशियाकडे १२८ . ५ बिलियन डॉलर किमतीचा सोन्याचा साठा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर आता रशियाकडे जगातील एकूण सोन्याचा जवळपास २२ . ९ टक्के भाग आहे. मागील ३ वर्षांमध्ये रशियाने आपल्या परदेशी चलनाच्या भंडारात डॉलरच्या जागेवर सोने आणि इतर चलनांना जागा दिलीय. यात चीनच्या युआन या चलनाचाही समावेश आहे. यामागे रशियाचं अमेरिकेवरील अवलंबत्व कमी करणं हा हेतू आहे.
व्लादीमिर पुतिन यांनी रशियाच्या अर्थव्यवस्थेला डॉलरच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी एक मोहिमच सुरु केली होती. याचा उद्देश अमेरिकेसोबत संबंध बिघडल्यास लादल्या जाणाऱ्या निर्बंधांपासून रशियाला वाचवणे हा हेतू होता. २०१४ ते १६ दरम्यान रशियाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी रशियाने आपल्या तेल उद्योगात झालेल्या नफ्याची गुंतवणूक परदेशी चलनात केली होती.
जगात जेव्हा युद्ध सुरु होतं तेव्हा कोणत्याही देशाच्या चलनाला काहीही मूल्य राहत नाही. अशा स्थितीत सोनं देऊनच शस्त्रास्त्र आणि इतर गोष्टींचा व्यवहार होतो. त्यामुळेच सोन्याची गुंतवणूक सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. वर्ल्ड गोल्ड काउंसिलनुसार जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरिकेकडे आहे. अमेरिकेकडे एकूण ८१३३ . ५ टन सोनं आहे. जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे अधिकृतपणे ३३६९ . ७० टन सोने आहे.