वरणगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरूध्द करण्यात आलेले आरोप हे अतिशय गंभीर असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आज माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केली. तसेच कुणाचाही जावई असो त्याच्यावर कारवाई होणारच या शब्दात त्यांनी ना. नवाब मलिक यांना टोला मारला. ते वरणगाव येथे आयोजित सत्काराच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.
आज वरणगाव येथे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पाणी पुरवठा योजनेला मिळालेली स्थगिती उठवण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना आ. गिरीश महाजन म्हणाले की, नवाब मलीक हे मंत्री असले तरी त्यांच्या जावयावर कारवाई होईलच. तपास यंत्रणा याबाबत चोख चौकशी करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, धनंजय मुंडे यांचे प्रकरण हे अतिशय गंभीर असून भाजप नेत्यांनी याच्या चौकशीची मागणी केली आहेच. यातच त्यांनी दुसरे लग्न केल्याचे प्रकरण हे संवेदनशील असून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे. यामुळे त्यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आ. गिरीश महाजन यांनी याप्रसंगी केली.
खालील व्हिडीओत पहा आ. गिरीश महाजन नेमके काय म्हणालेत ते ?