भोपाळ : वृत्तसंस्था । भारत बायोटेकतर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ या स्वदेशी लशीच्या चाचणीत भाग घेतलेला ४२ वर्षीय स्वयंसेवक चाचणीनंतर नऊ दिवसांनी भोपाळमध्ये मरण पावला.
हा मृत्यू विषबाधेमुळे झाला असल्याचा डॉक्टरांना संशय आहे, तर मृत्यूचा लशीच्या चाचणीशी संबंध नसल्याचे प्राथमिक आढाव्यात दिसल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे.
दीपक मडावी नावाच्या या व्यक्तीने १२ डिसेंबरला लस चाचणीत भाग घेतला होता, असे ही चाचणी जेथे घेण्यात आली, त्या पीपल्स मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलचे कुलगुरू डॉ. राजेश कपूर यांनी सांगितले. यानंतर नऊ दिवसांनी दीपक मरण पावला.
‘मडावी याने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीतील स्वयंसेवक म्हणून सर्व निकष मान्य केले होते. लशीची मात्रा दिल्यानंतर सात दिवसांनी तपासणीत त्याची प्रकृती चांगली होती आणि त्याच्यात कुठलीही विपरीत प्रतिक्रिया दिसून आली नव्हती,’ असे भारत बायोटेकने एका निवेदनात सांगितले.
ज्या डॉक्टरांनी उत्तरीय तपासणी केली, त्यांना मरावीचा मृत्यू विषबाधेने झाल्याचा संशय असल्याचे मध्य प्रदेशच्या मेडिको लीगल इन्स्टिटय़ूटचे डॉ. अशोक शर्मा यांनी सांगितले. व्हिसेरा चाचणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल, असे ते म्हणाले.
कुटुंबीयांचे म्हणणे.. : दीपक मडावी चाचणीनंतर घरी परत आला, तेव्हा त्याला अस्वस्थ वाटत होते व त्याला आरोग्यविषयक समस्या अनुभवाला आल्या, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला. १७ डिसेंबरला त्याने खांदा दुखत असल्याची तक्रार केली. दोन दिवसांनी त्याच्या तोंडातून फेस येत होता. आपल्याला एक-दोन दिवसांत बरे वाटेल असे सांगून त्याने डॉक्टरांकडे जायला नकार दिला. प्रकृती खालावल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करीत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला, असे कुटुंबीयांनी सांगितले.