बर्ड फ्लूच्या संसर्गाचा केंद्राचा राज्यांना इशारा

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राजस्थानमध्ये अचानक शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या कावळ्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ या संसर्गजन्य आजाराचे विषाणू आढळून आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने काही राज्यांसाठी अत्यंत सावधगिरीचा इशारा दिला आहे.

राजस्थानचे मुख्य सचिव कुंजीलाल मीना म्हणाले, “आत्तापर्यंत कोटा येथे ४७, झालवार येथे १०० तर बरान येथे ७२ कावळ्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. बुंदी येथे एकाही कावळ्याच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आम्ही आवश्यक पावलं उचलतं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती करत आहोत.”

दरम्यान, शनिवारी राजस्थानातील झालवर येथे २५, बरा येथे १९ आणि कोटा येथे २२ तर जोधपूर येथे १५२ कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. झालवर, कोटा, पाली आणि इतर ठिकाणांहून कावळ्यांचे मृत्यू झाल्याच्या बातम्या आहेत. यामध्ये किंगफिशर आणि मॅगपाईज नावाच्या चिमण्यांचाही समावेश आहे. झालवर येथे याबाबत कन्ट्रोल रुम स्थापन करण्यात आल्याचे मीना यांनी सांगितले. संपूर्ण राजस्थानमध्ये हायअलर्ट घोषीत केल्याचेही ते म्हणाले.

मध्य प्रदेशातील इंदूर येथे आढळलेल्या मृत कावळ्यांपैकी ५० कावळ्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे या ठिकाणीही अलर्ट घोषीत करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने राज्यांसाठी अलर्ट घोषीत केला असून ज्या ठिकाणी मृत कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळून आले आहेत, त्या ठिकाणचे नमुने गोळा करुन त्याच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर संबंधित विभागाने बर्ड फ्लूची लक्षण आढळून आल्याची ठिकाणं निश्चित करण्यासाठी एक मोहिम सुरु केली आहे.

Protected Content