बोदवड प्रतिनिधी । बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या कापसाची चोरी करणाऱ्या संशयिताला बोदवड पोलीसांनी शनिवारी अटक केली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या कापूस खरेदी केंद्रावर अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी विविध वाहनांमधून आणला आहे. नंबरप्रमाणे कापसाची मोजणी होते. यात रविंद्र दयाराम बेदरकर (वय-३६) रा. देवधाबा ता. मुलाकापूर जि. बुलढाणा या शेतकऱ्यानेही आपला कापूस विक्रीसाठी कापूस खरेदी केंद्रावर आणला होता. शनिवार २ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी अशोक वाघ रा. भिलवाला ता. बोदवड याने ६० किलो वजनाचा कापूस चोरून नेल्याचे शेतकरी रविंद्र बेदरकर यांच्या लक्षात आले. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अशोक वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गजानन चांगो करीत आहे.