नवी दिल्ली : वृत्तसंस्था | प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या सिंघू सीमेवर ‘ट्रॅक्टर परेड’ काढणार असल्याचं संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केलं आहे. आज पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी माहिती दिली.
४ जानेवारी रोजी जर सरकारने आमची मागणी मान्य केली नाही, तर आंदोलन तीव्र केलं जाईल, असं यावेळी सांगण्यात आलं.
संयुक्त किसान मोर्चाने आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला बीएस राजेवाल, दर्शन पाल, गुरूनाम सिंह, जगजीत सिंह, शिव कुमार शर्मा कक्का आणि योगेंद्र यादव उपस्थित होते. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी जोवर पूर्ण होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. येत्या ६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च आयोजित करण्यात येणार आहे. तर १५ जानेवारी रोजी भाजपच्या नेत्यांना घेराव घालणार असल्याची रणनिती शेतकऱ्यांनी आखली आहे.
२३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मदिनी राज्यपाल भवनापर्यंत मोर्चा काढण्याचं शेतकऱ्यांनी ठरवलं आहे. त्यानंतर २६ जानेवारी रोजी दिल्लीत सर्व शेतकरी ट्रॅक्टर परेड करतील, असं संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केलं आहे.