नवी दिल्ली : वृत्तसंस्था| भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग हळूहळू पसरत आहे. ब्रिटनहून आलेल्या २० प्रवाशांमध्ये आतापर्यंत नवा स्ट्रेन आढळून आलेला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळालेली आहे.
सध्या ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
कोलकात्तामध्ये नव्या स्ट्रेनचा प्रकार समोर आला आहे. ब्रिटनहून आलेल्या एका व्यक्तीमध्ये या नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळली आहेत. ज्याला आता क्वारंटाईन करण्यात आले आहे. जीनोम स्किवेंसिंगनंतर हा स्ट्रेन आढळला, मागील आठवड्यातच हा व्यक्ती यूकेवरून परतला होता.
कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी माहिती दिली आहे की, राज्यात जवळपास ७ लोकांमध्ये नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळली आहेत. ३ बंगळुरू व ४ शिमोगामधील आहेत. जी लोकं शिमोगामध्ये पॉझिटिव्ह आढळली आहेत, त्यांच्या संपर्कातील काही लोकांना देखील कोरोना झालेला आहे.
मागील काही दिवसांपासून ब्रिटनहून येणाऱ्या सर्वांची तपासणी केली जात आहे. जी लोकं पॉझिटिव्ह आढळत आहेत, त्यांची जीनोम स्किवेंसिंग करून नव्या स्ट्रेनचा शोध घेतला जात आहे. मंगळवारी उत्तर प्रदेशमधील मरेठ येथे दोन वर्षीय मुलीमध्ये नवा स्ट्रेन आढळून आला होता. मुलीचे कुटुंब ब्रिटनहून परतले होते. त्यानंतर मुलीसह तिचे आई-वडील पॉझिटिव्ह आढळले होते. नवा स्ट्रेन मात्र केवळ दोन वर्षीय मुलीतच आढळला होता.
बुधवारी बंगळुरु, पुणे आणि हैदराबादच्या प्रयोगशाळांमध्ये नव्या स्ट्रेनची प्रकरणं समोर आली होती. ब्रिटनपासून सुरू झालेला हा नवा स्ट्रेन सध्या असलेल्या व्हायरसपेक्षा ७० टक्के अधिक भयानक आहे.
काही दिवासांपूर्वीच आरोग्यमंत्रालयाने आश्वासन दिलं आहे की, वॅक्सीन या नव्या स्ट्रेनवर देखील परिणामकारक आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. भारतात मागील महिनाभरात जवळपास ३० हजारांच्या आसपास नागरिक यूकेवरून परतले आहेत, ज्यामध्ये शंभराहून अधिक पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आलेलं आहे