जामनेर प्रतिनिधी । ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर प्रफुल्ल लोढा यांनी केलेले बेछूट आरोप खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल लोढा यांनी जळगावातील पत्रकार परिषदेत पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजमाता जिजाऊ चौकातील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन लोढांवर शरसंधान केले.
या पत्रकार परिषदेत लोढांचा तीव्र निषेध करण्यात आला. जळगावात जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर भान नसताना खालच्या पातळीवरील आरोप करणार्या प्रफुल्ल लोढा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिले. या पुढे कोणतेही तथ्य नसताना पक्षाच्या नेत्यांवर असे बेछूट व बेताल आरोप खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला. तर जर वक्तव्य थांबवले नाहीत तर लोढा यांना न्यायालयात खेचू असा इशारा देखील किशोर पाटील यांनी दिला.
या वेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, जितेश पाटील, माधव चव्हाण, प्रभू झाल्टे, विनोद माळी, संदीप हिवाळे, प्रल्हाद बोरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.