भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वडगाव सतीचे येथील मृतदेह आढळून आलेल्या बालकाच्या खुनाचा उलगडा झाला असून त्याच्या काकानेच हे भयंकर कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत वृत्त असे की, वडगाव सतीचे येथील दीपक गायकवाड यांचा मुलगा आयुष हा १४ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपासून बेपत्ता झाल्याने भडगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांना रात्री १०.३०ला वडगाव हायस्कूलजवळील दिलीप जाधव यांच्या शेतातील विहिरीत आयुषचा मृतदेह आढळला. पहिल्यांदाच संशय आल्याने त्यांनी रात्रीच संशयित म्हणून आयुषचा सख्खा काका नीलेश रामदास गायकवाड (वय २०, रा.वडगाव सतीचे) याला ताब्यात घेतले.
दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी संशयित नीलेशची कसून चौकशी केली असता याने भावासोबत असलेल्या पैशांच्या वादातून आयुषला कमरेवर लाथ मारून विहिरीत ढकलल्याची कबुली दिली. यामुळा याप्रकरणी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवले आहे.