नवी दिल्ली । सोनिया, राहूल व प्रियंका गांधी यांनी काँग्रेस पक्ष सोडावा असा सल्ला आज ख्यातनाम लेखक तथा इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी दिला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षातील अंतर्गत कलह उफाळून आला असतांना आता रामचंद्र गुहा यांनी काँग्रेसच्या भविष्याबाबत सविस्तर उहापोह करणारा लेख प्रकाशित केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, पुढील लोकसभा निवडणुकींसाठी अजूनही तीन वर्षे बाकी आहेत. या कालावधीमध्ये काँग्रेसने स्वत:ला पुन्हा उभं केलं पाहिजे. भविष्यातील नेतृत्व पक्षबांधणीच्या माध्यमातून समोर आणलं पाहिजे. इतर विरोधी पक्षांना एकत्र घेऊन आघाडी स्थापन करुन कणखर पर्याय निर्माण केला पाहिजे, असं गुहा यांनी म्हटलं आहे. गुहा यांनी आपल्या लेखात स्पष्टपणे गांधी कुटुंबाने केवळ काँग्रेसच्या प्रमुख नेतृत्वावरुनच नाही तर पक्षापासूनच दूर जाण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, काँग्रेस एकीकडे आपण उदारमतवादी असल्याचे सांगत त्याचे श्रेय घेते. तस दुसर्या दिवशी ते उद्योजकांना विरोध करताना दिसतात. गुहा यांनी, मी ज्या काँग्रेसचा समर्थक होतो ती महात्मा गांधीची काँग्रेस आहे. त्या काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवू देत देशामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या मुल्यांची जोपासना करण्याला प्राधान्य दिलं होतं. मात्र आज काँग्रेस स्वत:ला स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणवते आणि दुसरीकडे मवाळ हिंदुत्वाचे धोरण अवलंबताना दिसत आहे, अशी टीका केली आहे.
याच लेखात गुहा यांनी भाजपच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. मोदी, शाह आणि नड्डा हे भाजपाचे तिन्ही प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले आहेत. या तिघांनाही राजकारण हे वासरा म्हणून मिळालेलं नाही. या तिघांमध्येही हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे घेऊन जाण्याची ताकद असून सध्या ते तेच करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती उलट असून तिथे तिन्ही मोठे नेते वैचारिक पातळीवर एकमेकांशी जोडलेले दिसत नाहीत असे निरिक्षण त्यांनी नोंदविले आहे.