कुतुबमीनार’ मंदिरं पाडून उभारण्यात आल्याचा कोर्टात दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कुतुबमीनार आणि परिसरात उभी असलेली ‘कुव्वत उल इस्लाम’ मशीद २७ हिंदू आणि जैन मंदिरांना पाडून उभारण्यात आल्याचा दावा कोर्टात याचिकेतून करण्यात आलाय. हे सिद्ध करणारे अनेक पुरावे इतिहासात उपलब्ध असल्याचा दावाही एका याचिकेत करण्यात आलाय.

 

अयोध्येत राम जन्मभूमी जमिनीचा खटला जिंकल्यानंतर आता काशी आणि मथुरेतही हिंदू संघटना सक्रीय झाल्या आहेत. याच दरम्यान कुतुबमीनार परिसरातील मशिदीविरोधात दिल्लीच्या साकेत कोर्टातही एक याचिका दाखल करण्यात आलीय. वकील हरिशंकर जैन यांच्याकडून या याचिकेवर दिल्लीच्या साकेत कोर्टात मंगळवारी जवळपास एक तास सुनावणी झाली.

या मशिदीसाठी पाडण्यात आलेली मंदिरं पुन्हा उभारून या स्थळावर विधीपूर्वक २७ देवी-देवतांची पूजा करण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आलीय. हरिशंकर जैन आणि रंजना अग्निहोत्री यांनी जैन तीर्थकर ऋषभ देव आणि भगवान विष्णू यांच्या नावानं ही याचिका दाखल केलीय. अनुच्छेद २५ आणि २६ नुसार मिळालेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारानुसार मंदिरांच्या पुनर्स्थापनेसाठी ही याचिका दाखल करत असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलंय.

ही याचिका खूपच लांबवलचक आहे. त्यामुळे या याचिकेची आणि त्यात करण्यात आलेल्या दाव्यांचा बारकाईनं अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचं न्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान म्हटलंय. या प्रकरणात पुढची सुनावणी २४ डिसेंबर रोजी होणार आहे. १३ व्या शतकात उभारण्यात आलेलं कुतुबमीनार युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे.

Protected Content