जळगाव सचिन गोसावी । केंद्र सरकारने आयुर्वेदीक पदवीधर डॉक्टरांना ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली असून याला इंडियन मेडिकल असोसिएशनने तीव्र विरोध दर्शविला आहे. शस्त्रक्रियेचे कौशल्य शिकण्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. याचा विचार करता आयुर्वेदीक डॉक्टर्सला याची परवानगी दिल्यास याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. आमचा विरोध हा आयुर्वेदाला नसून अर्धवट ज्ञानामुळे होणार्या हानीला असल्याचे प्रतिपादन आयएमए जळगावचे सचिव डॉ. स्नेहल फेगडे यांनी केले.
केंद्र सरकारने अलीकडेच आयुर्वेदीक पदवीधरांना तब्बल ५७ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. हा निर्णय वादाच्या भोवर्यात सापडला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने याला प्रखर विरोध दर्शवत बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमिवर, जळगाव आयएमएचे सचिव डॉ. स्नेहल फेगडे यांच्याशी वार्तालाप केला असता त्यांनी या प्रकरणी आयएमएची भूमिका मांडली.
डॉ. फेगडे म्हणाले की, सरकारच्या या निर्णयात लहानमोठ्या ५८ शस्त्रक्रियांचा समावेश आहे. यात इएनटी, नेत्ररोग आदींसह अन्य ऑपरेशन्सचा समावेश आहे. खरं तर शस्त्रक्रिया हे नाजूक शास्त्र असून याच्या अध्ययन आणि सरावासाठी दीर्घ वेळ लागतो. यासाठी सरकारने एमबीबीएस आणि नंतरच्या अन्य अभ्यासक्रमांमध्ये स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. यानंतरच कुणीही व्यक्ती हा शस्त्रक्रियेत पारंगत होत असतो. तथापि, सरकारने कोणताही सारासार विचार न करता आयुर्वेदीक पदवीधरांना शस्त्रक्रियेची परवानगी देण्याचा निर्णय हा चुकीचा आहे. ही मॉडर्न मेडिसीनमध्ये बॅक डोअरची एंट्री असल्याचा आरोप त्यांनी केला.
डॉ. फेगडे पुढे म्हणाले की, सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात देशभरातील वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी निषेध करणार आहेत. तर ८ डिसेंबर रोजी आयएमएचे सदस्य निदर्शने करणार आहेत. यानंतर ११ डिसेंबर रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत बंद पाळण्यात येणार आहे. या नंतरही संबंधीत निर्णयावर फेरविचार न झाल्यास कोर्टात जाण्यासह आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. आयुर्वेद अथवा कोणत्याही पॅथीला आपला विरोध नसून अर्धवट ज्ञानामुळे होणार्या हानीला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध असल्याचे डॉ. फेगडे यांनी स्पष्ट केले.
खालील व्हिडीओत पहा डॉ. स्नेहल फेगडे नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/508992935887325/videos/703065957016622