हैदराबाद : वृत्तसंस्था ।ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने ८० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. हाच ट्रेंड कायम राहिल्यास भाजप हैदराबादवर भगवा फडकवणं निश्चित आहे.
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा पक्ष टीआरएस आणि असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एमआयएमवर भाजपने मात केल्याचं सुरुवातीचं चित्र आहे.हैदराबाद हे दक्षिण भारतातील अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. दक्षिण भारतात कर्नाटकचा अपवाद वगळला तर भाजपला फारशी अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. आता तामिळनाडूचीही निवडणूक जवळ आहे. त्या पार्श्वभूमीवर हैदराबादमधील यश कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुनावणारं आहे.
भाजपने हैदराबादसाठी ज्या पद्धतीने ताकद लावली ते पाहता भाजपचं दीर्घकालीन धोरण स्पष्ट दिसून येतं. भाजप अत्यंत आक्रमकतेने तेलंगणात पाय रोवण्याच्या मनस्थितीत आहे. महापालिका क्षेत्रात विधानसभेचे २४ मतदारसंघ आहेत. तेलंगणात पुढची विधानसभा निवडणूक २०२३ ला होईल. त्यापूर्वी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. टीआरएसने २०१६ ला महापालिकेत ९९ आणि एमआयएमने ४४ जागा जिंकल्या होत्या. डिसेंबर २०१८ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने एकतर्फी विजय मिळवला होता. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने टीआरएसकडून चार जागा हिसकावून घेतल्या. १० नोव्हेंबरला झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपने आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला होता.