रावेर प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत रावेर विधानसभा क्षेत्रातून प्रसासकीय तयारी जोरदार सुरू असून आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी तीन भरारी पथके आणि तीन ठिकाणी सीमावर्ती भागातील पाहणी करण्यासाठी चेकपोस्ट निर्माण करण्यात आले आहेत.
या बाबत सहा निवडणूक अधिकारी अजित थोरबोले यांनी माहिती दिली की, रावेर विधानसभा क्षेत्रात ३०८ मतदान केंद्र असून ११ केंद्र राखीव ठेवण्यात आले आहेत. यात १०२३ दिव्यांग मतदार आहेत त्यांच्या साठी लागणार्या सर्व सुविधा आणि मतदान केंद्र येथील अत्यावश्यक बाबींच्या पूर्ततेसाठी लक्ष दिले जात असून प्रत्येक केंद्राचा आढावा घेण्यात येत आहे. रावेर तहसीलदार अभिलाषा देवगुणे आणि यावल तहसीलदार श्री कुंवर यांच्या सह निवडणुकीत नेमणूक करण्यात आलेलेसर्व क्षेत्रीय अधिकारी यावर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, तालुक्यात ३ भरारी पथके नेमण्यात आले असून आचारसंहिता भंग करणारे बोर्ड अथवा मजकूर आढळल्यास ते कारवाई करतील तर चोरवड नाका, शेरी नाका(पाल) आणि भुसावळ जवळ तापी नदी पुलावर या ठिकाणी तपासणी पथके ठेवण्यात आली आहेत. रावेर,निंभोरा, फैजपूर, यावल पोलीस स्टेशन अंतर्गत १०७ आणि ११० या केसेस मधील कारवाई करावयाचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचा सूचना देखील करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत एक स्वतंत्र महिलांसाठी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात येईल आणि काही मतदान केंद्रांची वेब कॉस्टिंग म्हणजेच थेट प्रसारण देखील करण्यात येईल अशीही माहिती प्रांताधिकारी थोरबोले यांनी दिली आहे.