मुंबई, वृत्तसंस्था । सातत्याच्या मागणी नंतर राज्य सरकारने राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्यात आली आहेत. यानंतर धार्मिक स्थळं खुली करण्यात आल्यानंतर रझा अकादमीने राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडण्याची मागणी केली आहे.
रझा अकादमीनं यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र दिलं आहे. त्यामुळे राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे. तर राजभवनानं या प्रकरणी भाष्य करण्यास नकार दिला आहे. राजभवनामध्ये कोणतीही मशीद नसल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तात म्हटलं आहे. मात्र, मुस्लीम कर्मचाऱ्यांना नमाज पठण करता यावं म्हणून स्टाफ क्वार्टरमधील एक रुम उघडी करून देण्यात आलेली होती. त्यामुळे बाहेरून येणारे इतर सामान्य लोकही या ठिकाणी नमाज पठण करायचे. त्यामुळे या ठिकाणी हळूहळू गर्दी वाढायला लागली होती. शुक्रवारी बाहेरील लोक येथे नमाजासाठी यायचे. परंतु, करोनाच्या काळात गर्दी वाढत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांना आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती, असं सूत्रांनी सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.