पाटणा : वृत्तसंस्था । सहायक प्राध्यपक नियुक्तीत भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या शिक्षणमंत्री डॉ. मेवालाल चौधरी यांना आज राजीनामा द्यावा लागला हा मुद्दा राजद व सीपीआय एमएलने उचलून धरला होता. अखेर सरकार स्थापन झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी मेवालाल चौधरी यांनी शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
मंत्रीपदाचा राजीनामा देताना मेवालाल चौधरी यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तरही दिले आहे. कोणताही खटला तेव्हा सिद्ध होतो, जेव्हा तुमच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले आहे किंवा न्यायालयाने काही निर्णय दिला आहे. माझ्या विरोधात आरोपपत्रही नाही आणि गुन्ह्याची नोंदही झालेली नाही.
दरम्यान, या अगोदर बिहारचे माजी मुख्यमंत्री व राजदचे सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनी देखील, सहायक प्राध्यपक नियुक्तीत भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीस शिक्षणमंत्री बनवण्यात आल्यावरून मुख्यमंत्री नितीश कुमार व भाजपावर निशाणा साधला होता. ”दुर्देवं पहा जे भाजपावाले कालपर्यंत मेवालालचा शोध घेत होते, आज मेवा मिळाताच त्यांनी मौन बाळगलं आहे.” असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं होतं.
तेजस्वी जिथं पहिल्याच कॅबिनेटमध्ये पहिल्या स्वाक्षरीनिशी १० लाख नोकऱ्या देण्यासाठी कटिबद्ध होते. तिथं नितीश यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये नियुक्तीत घोटाळा करणाऱ्या मेवालाल यांना मंत्री बनवून आपली प्राथमिकता दर्शवली आहे आहे. असा टोलाही लालू प्रसाद यादव यांनी लगावला होता.
राजदने म्हटले होते की, ”भ्रष्टाचारातील आरोपी आणि नितीश कुमार यांचे नवरत्न नवे शिक्षणमंत्री मेवलाल चौधरी यांच्यावर त्यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचा देखील आरोप आहे. जेव्हा माध्यमांनी विचारले तर त्यांचा पीए धमकावू लागला. एनडीएची गुंडागर्दी सुरू आहे, महाजंगलराजचे दिल्लीतील महाराजा गप्प आहेत. ६० घोटाळ्यांचे रक्षणकर्ते नितीश कुमार यांचा दुटप्पी चेहरा. हा माणूस खुर्चीसाठी कितीही खालच्या पातळीपर्यंत पडू शकतो.”