निमखेडी शिवारातील नियोजित कचरा प्रकल्पास उपमहापौर खडके यांची भेट

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातुन संकलित होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रीया करण्यासाठी निमखेडी शिवारात उभारण्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्प स्थळाला उपमहापौर सुनिल खडके यांनी आज मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी  भेट दिली. महापालिका नियोजित प्रकल्पस्थळी डंपिग केलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग आणि प्रकल्प उभारणी या दोहोंसाठी स्वतंत्र मक्ते देण्यात आलेले आहेत. मात्र मुदत संपुनही हे दोन्ही प्रकल्प पुर्ण झाले नसल्याने उपमहापौर यांनी नाराजी व्यक्त करत त्यांनी आयुक्त सतिश कुलकर्णी यांचीही भेट घेतली.

प्रकल्प आराखडयात फेरबदल करणे आवश्यक झाल्याने प्रकल्पाचे काम रखडल्याची माहिती समोर आली. सुधारित आराखडा तयार करुन तो त्वरीत महासभेसमोर ठेवण्याच्या सुचना सुनिल खडके यांनी प्रशासनास दिल्या आहेत. प्रकल्पस्थळी डंपिग करण्यात आलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यासाठी ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंन्ट यांना मक्ता दिलेला आहे. मात्र कोरोना काळामुळे हे काम अद्याप ६३ टक्के इतकेच होऊ शकलेले आहे. अशी माहिती प्रकल्प अभियंता योगेश बोरोले यांनी दिली. परंतु हे दोन्ही कामे संशयास्पद असल्याचे उपमहापौर सुनिल खडके यांनी आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर कळविले आहे. या कामातील विलंबामुळे तसेच नविन कचरा डंपिगचे काम सतत सुरुच असल्यानेही प्रकल्प उभारणीचे काम सुरु करण्यात अडचणी आहेत. नविन कचरा डंप करतांना प्रकल्पाला अडथळा निर्माण होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सुचना उपमहापौरांनी स्वच्छता विभागाला केल्या.
उपमहापौरांनी यावेळी प्रकल्पाजवळील लोकवस्तीला भेट दिली त्यावेळी लोकांनी बायोमायनिंगपुर्वी परिसरात दुर्गंधी आणि चिलटे किटक यांचा त्रास मोठया प्रमाणावर सहन करावा लागत होता अशी आशी व्यथा मांडली. यावर प्रशासकीय दिरंगाई बद्दल उपमहापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
साइटवरील प्रत्यक्ष स्थिती आणि जुन्या आराखडयात असलेल्या काही त्रुटी विचारात घेऊन प्रकल्प अहवालात काही सुधारणा आवश्यक झाल्या आहेत. त्यामुळे प्रकल्प उभारणीच्या कार्यात अडसर असल्याची बाब समोर आल्याने प्रकल्प अहवाल सुधारीत करण्याचा प्रस्ताव निर्णयासाठी त्वरीत महासभेसमोर ठेवण्याच्या सुचना उपमहापौरांनी दिल्या आहेत.

बायोमायनिंग प्रक्रीयेत प्लास्टीक आणि घनपदार्थ वेगळे करुन उरलेल्या कचऱ्यापासुन खतनिर्मिती केली जाते. हा मक्ता नोव्हेंबर २०१९ मध्ये ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंन्ट यांना देण्यात आला. १ लक्ष क्युबीक टन कचऱ्याचे बायोमायनिंग करण्याचे लक्ष होते. झालेल्या कामाचे इंजिनिअरींग कॉलेज मार्फत ऑडीट करुन घेण्यात आले. सहा महिने इतकीच मुदत असतांनाही वर्ष उलटुनही काम पुर्ण झालेले नाही. प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीचा १२ कोटी रुपयांचा मक्ता लक्ष्मी कन्ट्रक्शन कंपनी यांना सप्टेंबर २०१९ मध्ये देण्यात आलेला आहे. मात्र स्ट्रक्चर आणि शेड यांची मापे, प्रकार हा या प्रकल्पाच्या दृ्टीने अनुकूल नसल्याने तसेच अवजड वाहने आणि मशिनरी याव्दारे काम होणार असल्याने फ्लोरींग कॉक्रीटचे असणे गरजेचे आहे. मात्र मुळ आराखडयात शहाबादी फरशी दाखविलेली आहे. त्यामुळे प्रकल्प आराखडयात (डि.पी.आर ) दुरुस्ती करणे भाग झालेले आहे. हे प्रकल्पाच्या विलंबाचे एक कारण आहे. मुळ संपुर्ण प्रकल्पासाठी ३१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असुन त्यातील १२ कोटी रुपये कचरा वाहक वाहने, गारर्बेज कॉम्पॅक्टर हॅन्डकार्ट इत्यादी खरेदीवर खर्च झालेले आहेत. आराखडयातील सुधारणांमुळे प्रकल्पाच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Protected Content