बीड वृत्तसंस्था । पुण्याहून गावी परतताना रस्त्यातच एका माथेफिरूने आपल्या प्रेयसीवर अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळल्याची घटना बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगावातील येथील एक २२ वर्षाची तरूणी ही शेळगावातीलच रहिवासी असणार्या अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक १३ नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात निर्मनुष्य ठिकाणी आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर या तरुणाने रस्त्याच्या कडेला अगोदर तरुणीवर अॅसिड व पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला.
पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हापासून ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्यात दुपारी २ वाजेपर्यंत तडफडत होती. वरून जाणार्यांना आवाज आल्याने खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या तरुणी दिसली. त्यानंतर तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.