भुसावळ प्रतिनिधी । अहंकार कुणाचाच टिकत नाही, यामुळे ‘त्यांचा’ अहंकार देखील धुळीस मिळेल अशा शब्दात अशोक फडके यांनी एकनाथराव खडसे यांच्यावर वरणगाव येथील कार्यक्रमात टिकास्त्र सोडले.
काही दिवसांपूर्वीच एकनाथराव खडसे यांनी कुर्हा-काकोडा येथील कार्यक्रमात भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. यात बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमिवर, वरणगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात त्यांनी एकनाथराव खडसे यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली.
या संदर्भातील कुर्हा-काकोडा येथील हे वृत्तदेखील वाचा
डॉ. राजेंद्र फडके म्हणाले की, कुणाच्या जाण्याने पक्षावर फरक पडत नाही. अगदी रावणाचाही अहंकार टिकला नाही, यामुळे त्यांचा अहंकार देखील धुळीस मिळेल. दरम्यान, भाजपच्या नवीन कार्यकारिणीत सर्वांना समान न्याय मिळणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अशोक कांडेलकर, नगराध्यक्ष सुनील काळे, भुसावळचे ज्येष्ठ पदाधिकारी अजय भोळे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, प्रा. जतीन मेढे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.