राज्यात लवकरच ९ हजार गृहरक्षकांची भरती होणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. गृहरक्षक दल अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात रिक्त असलेल्या ९ हजारांवर जवानांच्या भरतीचा प्रस्तावगृह खात्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक तथा महासमादेशक रितेशकुमार यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्त २०० जागा लवकरच भरण्यात येतील, असेही ते म्हणाले.

रितेशकुमार म्हणाले, राज्यात शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी; किंबहुना आणीबाणीच्या काळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून गृहरक्षक दलाचे जवान रात्र दिवस कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्या मूलभूत गरजा, समस्या सोडविण्याच्या दृष्टीने गृह खाते सकारात्मक आहे. दलातील जवानांच्या गृहरक्षक मानधनवाढीबाबतचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर करण्यात आला आहे. सध्या प्रतिदिन ६७० रुपये मानधन मिळते. त्यात कमाल वाढ करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय होईल, असेही ते म्हणाले. राज्यात गृहरक्षक दलाची ५५ हजार पदे मंजूर आहेत. त्यातील रिक्त ९ हजार पदांच्या भरतीबाबतही शासन स्तरावर लवकर निर्णय अपेक्षित आहे. यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे, असेही रितेशकुमार यांनी सांगितले.

गृहरक्षक दलाचे नूतन महासमादेशक तथा अप्पर पोलिस महासंचालक रितेशकुमार कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी भरती संदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. गृहरक्षक दलाच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा गृहरक्षक दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची देसाई यांनी माहिती दिली.

Protected Content