
भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील देव्हारी शिवारातील एका शेतामधील घरातून आज दुपारी भडगाव पोलिसांनी सुमारे ८ लाख ७४ हजार रुपये किंमतीचा ४३७ किलो गांजा जप्त केला आहे. यावेळी पोलिसांनी दोघांना अटक केली तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला.
या संदर्भात अधिक असे की, गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती की, देव्हारी शिवारातील एका शेतातातील घरात मोठ्या प्रमाणात गांजा लपवून ठेवण्यात आलेला आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले,अपर पोलीस अधीक्षक लोहित मतांनी चाळीसगाव विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी उत्तम कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, चाळीसगाव पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड, सपोनि जाधव,पीएसआय अनंतराव पठारे यांनी आज दुपारी २ वाजेच्या सुमारास देव्हारी शिवारातील शेतात असलेल्या एका घरात धाड टाकली. तेथे खतांच्या पोत्यात ८ लाख ७४ हजार रुपये किंमतीचा ४३७ किलो वजनाचा गांजा भरून ठेवलेला आढळून आला.
यावेळी पोलिसांनी सुनील मोहिते, संजय सरदार दोन्ही (रा.देव्हारी ता. भडगाव) या दोघांना अटक केली. तर त्यांचा एक साथीदार मात्र, घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यातआला असून तपास सपोनि जाधव करीत आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सुनील मोहिते हा आरोपी गांजा माफिया असल्याचे कळते.