जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे सतत गैरहजर राहत असून त्यांची हकलपट्टी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे भाऊंचे फाऊंडेशतर्फे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील आसोदा येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री.रोकडे हे मागील चार ते पाच महिन्यांपासून सतत गैरहजर राहत आहेत. सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्ह्यासह आसोदा येथे कोराना रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले होते. त्यात चार ते पाच नागरिकांचा कोरानामुळे मृत्यू झालेला आहे. अशा परिस्थितीत ग्रामसेवक हे गैरहजर राहत असल्यामुळे गावातील नागरीक संताप व्यक्त करीत आहे. तसेच संबंधित ग्रामसेवक यांनी आजपावेतो कोरोना च्या पार्श्वभूमीवर कुठलीही मिटींग आयोजित केलेली नाही.
संबंधित ग्रामसेवक यांची अनेक कागदपत्रांवर स्वाक्षरी लागत असते परंतु ते सतत गैरहजर असल्याने गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.तसेच ग्रामसेवक यांचा ग्रामपंचायतीवर कुठलाही अंकुश राहिलेला नाही. तरी संबंधित ग्रामसेवक श्री.रोकडे आप्पा यांची त्वरीत चौकशी करण्यात येवुन त्यांची आसोदा ग्रामपंचायतीमधून कामावरुन हकालपट्टी करण्यात यावी. संबंधित ग्रामसेवकाची १५ दिवसाच्या आत हकालपट्टी न झाल्यास भाऊचे फाऊंडेशन यांचेकडून तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल यांची दखल घ्यावी. अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर भाऊ फाऊंडेशनचे सदस्य सचिन चौधरी, डॉ. रमाकांत कदम, ललित बाविस्कर, उमेश बाविस्कर, मिलींद नारखेडे, लोकेश महाजन, ज्ञानेश्वर चौधरी, मनोज बिऱ्हाडे, योगेश नारखेडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.