जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या तपास प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ८ मोबाईल फॉरेन्सिक वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयातील परेड ग्राउंडवर या ८ मोबाईल फॉरेन्सिक वाहनांना हिरवा झेंडा दाखवून औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
फॉरेन्सिक व्हॅन्सच्या साहाय्याने गुन्हे तपास अधिक गतिमान
या वाहनांमुळे गंभीर गुन्ह्यांचा जलद आणि अचूक तपास करणे शक्य होणार आहे. विशेषतः सात वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यांमध्ये या व्हॅन्सचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जाणार आहे.
विशेष पोलीस निरीक्षक श्री. कराळे यांनी सांगितले की, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा तज्ञांच्या सहाय्याने घटनास्थळी त्वरित भेट देता येईल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फॉरेन्सिक सहाय्य, परिस्थितीजन्य पुरावे संकलन आणि विश्लेषण करता येणार आहे. ही वाहने जळगाव जिल्ह्यातील ८ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
वाहनांमध्ये अत्याधुनिक प्रणालीचा समावेश
या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ, फॉरेन्सिक किट, आवश्यक रसायने आणि अत्याधुनिक सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वाहनांमध्ये असणाऱ्या क्राईम सीन अॅप्लिकेशनमध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, ज्यामुळे गुन्हेगारी स्थळावरील तपासणी, पुराव्यांचे संकलन आणि त्यांचे बारकोडच्या माध्यमातून सुरक्षित संग्रहण करता येईल.
उद्घाटन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती
सदर कार्यक्रम विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांची आणखी एक प्रभावी पाऊल
या फॉरेन्सिक व्हॅन्सच्या मदतीने गुन्हे तपास अधिक वेगवान आणि अचूक होईल. घटनास्थळी त्वरित वैज्ञानिक तपासणी करून पुरावे गोळा करता येणार असल्याने न्यायालयीन प्रक्रियेसाठीही या वाहनांचा मोठा उपयोग होणार आहे.