जळगाव तुषार वाघुळदे । महाराष्ट्राला एक वैभवशाली आणि सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या काळात त्यांनी बांधलेल्या पायविहिरी (बारव) आजही इतिहासाच्या साक्ष देतात. जळगाव जिल्ह्यात चार ते पाच ठिकाणी अशा विहिरी असून त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शासनाच्या पुरातत्व खात्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशा विहिरींभोवती संरक्षक कुंपण करण्यात येऊन ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून दर्जा देण्यात येऊन जतन करण्याची गरज आहे.
बारव म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या गावाला नदी वाहत नसे, त्या गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि इतर अनेक कामांसाठी बारवेचा वापर केला जात असे. या पायविहिरीचे त्या काळातील बांधकाम, त्यातील स्थापत्यकला वाखाणण्याजोगी अशीच असून नक्षीदार, गोलाकार आणि अत्यंत विचारपूर्वक केलेले असून बारवमध्ये हवेचा आणि प्रकाशाचा श्रोत यावा, यासाठीचे करण्यात आलेले सुबक बांधकाम थक्क करणारे आहे, ही प्रचिती प्रत्यक्ष निरीक्षण करतानाच येते. विहिरीच्यावर गोलाकार, चौकोनी आकाराचे कमानी सुद्धा लक्षवेधी आहेत. बारव म्हणजेच पायविहिरीला ‘घोडविहीर’ असे देखील म्हणतात. तिच्या पायऱ्या रुंदीला अधिक लांब असतात.
विहिरीत उतरण्यासाठी काही भागात पायऱ्या त्याही दगडाच्या असून काहीसा भाग हा भुयारी मार्गासारखा दिसतो. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली हे मोठे व बाजारपेठ असलेलं गाव..! पूर्वेकडे बुलडाणा तर उत्तरेकडे अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेश आहे. तिथे अशी विहीर आहे; न वापरात येणारी ही विहीर असून लांबी सुमारे ८० ते ९० फूट आहे. अगदी बाजूलाच मुस्लिम धर्माचं प्रार्थनास्थळ आहे. १७८० च्या नंतर ही विहीर बांधलेली असावी असा अंदाज आहे.मी शिलालेख बघण्याचा खूप प्रयत्न केला , परंतू दगडावर शेवाळे असल्याने दिसू शकले नाही. या पायविहिरीत मोठ्या प्रमाणात केरकचरा आणि गवताचे रान वाढलेले आहे. विहिरीच्यावर तीन ते चार विविध आकाराच्या उंच कमानी दिसून येतात.
अंतुर्ली गावच्या मुख्यरस्त्यावर ही पायविहीर आहे.या इतिहासकालीन पायविहिरीची दैनावस्था झाली आहे.लोकप्रतिनिधी आणि पुरातत्व खात्याचे पूर्णतः दुर्लक्ष दिसून येत आहे. याबाबत मुक्ताईनगर तालुक्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, तीर्थक्षेत्रे व ऐतिहासिक वास्तूंचे जतन होण्यासाठी विशेष निधी प्राप्त झाला आहे, लवकरच विकासासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. पूर्वी खान्देशची राजधानी बऱ्हाणपूर होती.मुघलकालीन हिंदुस्थानच्या नकाशामध्ये जळगांव व भुसावळचा उल्लेख नाही, मात्र अंतुर्लीचा उल्लेख सापडतो हे विशेष..!
अंतुर्लीपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या पावली हे गाव मध्यप्रदेशच्या हद्दीत येते. तेथेही रस्त्यालगत असलेल्या शालीग्राम पाटील यांच्या शेताच्या बांधावर त्या काळातील छोटी पायविहीर असून तो परिसर भकास वाटतो. या पायविहिरीच्या चारही बाजूने काटेरी झाडेझुडपे वाढलेली आहेत. विहीर बरीचशी खचलेल्या अवस्थेत असून विविध जातींच्या सापांचा वावर असतो असे लोक सांगतात. विहिरीत डोकावले असता कचरा व झाडांचा पालापाचोळा, फांद्या पडलेल्या आहेत. ती विहीर कोरडी असल्याचे परिसरातील लोक सांगतात.
अशाच प्रकारच्या इतिहासकालीन पायविहीर जळगावच्या नेरीनाक्याजवळ होती, पण ती विविध प्रकारचा घाणेरडा कचरा टाकून बुजविण्यात आली आहे. अनेकवेळा तो कचरा काही तरुण पेटवून देत असतात. ती विहीर सुद्धा आज इतिहासाची साक्ष देत आहे. विद्यापीठाच्या मागेही हनुमंत खोऱ्यात एक छोटी पायविहीर आहे. तंट्या भिल तिथे येत असे अशी आख्यायिका आहे. (बारव) नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सोनगाव येथे आहे, बाजूलाच श्री महादेवाचे मंदिर आहे. अष्टकोनी आकाराचे काही बांधकाम आहे. वास्तविकता: अशा पुरातन वास्तूचे सौंदर्यीकरण होऊन टिकण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.सोनगाव हे पुढारलेले गाव असून वैभवशाली परंपरा लाभली आहे. येथील बारव पाहण्यासाठी दूरवरून अभ्यासक आणि इतिहास प्रेमी येत असतात. युवापिढीस इतिहास माहिती असणे महत्त्वाचे आहे. धुळे जिल्ह्यातील थाळनेरनजीक आणि मुंबईकडे जाताना कसारा घाट संपल्यावर उजव्याबाजूला आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या अशा पायविहिरींचं भविष्यात जतन होणं ही काळाची गरज आहे. अशा अनेक विहिरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. लोक यात कचरा टाकतात, तसेच जाळतात देखील ..! ही बाब चिंताजनक आहे. हे वैभव टिकणार की नाही, शासन करते तरी काय ? असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. शासनाने यासाठी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील सांस्कृतिक वैभव कसे टिकून राहील याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे. अशा पायविहिरींची स्वच्छता मोहीम राबवून पुन्हा नवे वैभव प्राप्त होण्यासाठी सांस्कृतिक तसेच पर्यटन विभागाने लक्ष घालण्याची आग्रही मागणी पुढे आली आहे. बारव संवर्धन मोहीम अधिक गतिमान होण्यासाठी ग्रामस्थ, इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे. बघू या, शासनाला कितपत जाग येते …!!
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/290360438815025/