मुंबई : वृत्तसंस्था । तिसऱ्या लाटेत 700 मेट्रीक टन ऑक्सिजन ज्यावेळी लागेल त्या दिवशी लॉकडाऊन लागेल, असे आज आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केले.
कोरोनासह विविध मुद्द्यांवर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य विभागीकडून निर्बंध कमी करण्याबाबत प्रस्ताव गेला होता. बैठकीत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी तिसऱ्या लाटेचा विचार करता 200 मेट्रिक टन ऑक्सिजन वाढवणार असून 141 ऑक्सिजन प्लांटना मान्यता दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच 3800 मेट्रीक टन ऑक्सिजन लागू शकतो असे ते म्हणाले .
“मी स्वत: हायर एज्यूकेशनचे डायरेक्टरसोबत बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की, प्रत्येक विद्यापीठाचे कुलगुरु, त्या विद्यापीठाच्या अखत्यारित येणारे जिल्हे, तसेत शिक्षण संस्था यांच्या चर्चा करुन दोन-चार दिवसात आरोग्य विभागात अहवाल दिला जाईल. नंतर कॉलेज संदर्भात निर्णय होईल”, असं त्यांनी सांगितलं.
खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असेल तर 100 टक्के उपस्थितीनं काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयांना 24 तास चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, एका सत्रात 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी असेल.
रेस्टॉरंट्स सुरु करायचे असतील तर काय आणि कोणती काळजी घेतली गेली पाहिजे याबद्दल राजेश टोपे यांनी सविस्तर सांगितलं आहे. “जे लोक जेवणासाठी आलेले असतील त्यांना वेटिंग पिरयडमध्ये मास्क घालणे बंधनकारक असेल. पूर्ण उपहारगृह सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे. वेटर्सनेसुद्धा मास्क वापरणे बंधनकारक आहे. ग्राहकांच्या बसण्याची व्यवस्था ही सोशल डिस्टन्सिंगचा नियम लक्षात घेऊनच केलेली असावी. सर्व कर्मचारी तसेच मॅनेजमेंटने कोरोना लसीचा डबल डोस घेतलेला असणे गरजेचे आहे. या अटीशर्तीची पूर्तता केली असेल तरच रेस्टॉरंट्स उशिरापर्यंत सुरु ठेवण्यास मुभा असेल,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली