मेहसाणा (गुजरात)-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गुजरातमधील मेहसाणा शहरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. केवळ ७ वर्षांच्या चिमुरडीचा घरातील कपाटात अडकून गुदमरल्याने मृत्यू झाला आहे. ६ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेने केवळ मेहसाणा नव्हे तर महाराष्ट्रातही दुःखाची लाट पसरली आहे, कारण मृत मुलगी भुसावळ येथील ज्येष्ठ पत्रकार संतोष शेलोडे यांच्या नात असल्याचे समजते.
घटना मेहसाण्यातील कडी येथील करणनगर रोडवरील ‘सुकन बंगला’ या परिसरातील आहे. मृत मुलीचे नाव एषा तुषार सुर्यवंशी (वय ७) असून तिचे वडील तुषार सुर्यवंशी हे मूळचे महाराष्ट्रातील आहेत. घटनेच्या वेळी एषाची आई घराच्या गच्चीवर साफसफाई करत होती. त्या दरम्यान खेळता खेळता एषा कपड्यांच्या कपाटात शिरली. काही वेळाने तिचा आवाज न आल्याने आईने शोध घेतला असता ती कपाटात बेशुद्धावस्थेत आढळली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एषा आपल्या निरागस हसऱ्या स्वभावामुळे सर्वांच्या आवडीची होती, त्यामुळे तिच्या अकाली जाण्याने परिसरातील नागरिक तसेच स्नेहीजन भावनिक झाले आहेत. सुर्यवंशी कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेतून पुन्हा एकदा हे अधोरेखित झाले आहे की लहान मुलांवर घरात सतत लक्ष ठेवणे किती आवश्यक आहे. घरातील बंद कपाटे, फ्रीज किंवा इतर अरुंद जागा मुलांसाठी किती धोकादायक ठरू शकतात, याची जाणीव प्रत्येक पालकांनी ठेवणे गरजेचे आहे.



