पाचोरा प्रतिनिधी । कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमिवर पाचोरा आणि भडगाव तालुक्यांमध्ये २५ जुलैपासून सात दिवसांचे सक्तीचे लॉकडाऊन पाळण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
याबाबत वृत्त असे की, पाचोरा व भडगाव तालुक्यात कोरोनाचा दिवसेंदिवस संसर्ग वाढतच आहे. यामुळे सर्वमताने २५ ते ३१ जुलैदरम्यान ७ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेे. या संदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निर्देशानुसार प्रांताधिकारी तथा इन्सीडेंट अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या नावाने आदेश पारीत करण्यात आले आहेत. सात दिवस करण्यात आलेल्या या लॉकडाऊनच्या कालावधीत किराणा दुकाने, कृषी सेवा केंद्र, जनरल स्टोअर्स, भाजी मार्केट यासह सर्वच व्यवहार बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून केवळ सकाळी ७ ते १० व दुपारी ४ ते ७ वाजेपर्यंत दूध डेअरी सुरू राहील. दूध डेरीत ही दुधव्यतिरिक्त इतर कोणतेही पदार्थ विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर डेअरीत अन्य वस्तुंची विक्री होताना आढळल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे.
या लॉकडाऊनच्या दरम्यान दूध डेअरी व वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवावे. अति महत्वाच्या कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.