जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील प्रतिष्ठीत पु.ना. गाडगीळ आणि सन्सच्या कलादालनात ६३ व्या १५ दिवसीय कलाप्रदर्शनीची दिमाखदार सुरवात करण्यात आली. या कलाप्रदर्शनीने कला जगतात रमणाऱ्या सर्व कलाप्रेमीं मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कलाप्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बऱ्हाणपूर येथील रागिनी कला संगित महाविद्यालयाचे प्राचार्य तथा जेष्ठ चित्रकार सतीश वर्मा, खिरोदा येथील सप्तपुत ललित कला भवानाचे प्राचार्य अतुल मालखेडे, मु.जे. महाविद्यालयातील फाईन आर्टचे विभाग प्रमुख मिलन भामरे आणि पु.ना. गाळगीळचे व्यवस्थापक संदीप पोतदार यांच्याहस्ते १५ दिवसीय प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत, सर्व सहभागी विद्यार्थी चित्रकाराचे उत्साह वाढवला व कौतुकाची थाप आपल्या शब्दांतून देऊन या विद्यार्थी चित्रकारांना प्रोत्साहन दिले. भविष्यात असेच प्रदर्शनीचे आयोजन होत रहावे आणि जास्तीत जास्त संख्येने युवा चित्रकार घडत रहावे अशी सदिच्छा व्यक्त केली तसेच समस्त जळगावकर आणि कलाप्रेमींसाठी हे कलाप्रदर्शन १५ सप्टेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे तरी जास्तीतजास्त संख्येने या प्रदर्शनीला भेट देऊन कालाकरांचे उत्साहवर्धन करावे. असे आवाहन देखील मान्यवरांनी केले आहे.
या कलाप्रदर्शनीमधे युवा विद्यार्थी चित्रकार योगिता अत्तरदे, अमोल पाटील, दिपाली चिखलीकर, आरती रायपुरे, दुर्गा तायडे आणि निलम मित्तल यांनी एब्स्ट्राक्ट, ल्यान्डस्कॅप, क्रियेटीव कॉम्पोझीशन, अजंता सिरीज व मिनीयेचर पेटींग्स अशा विविध चित्रशैलींद्वारे कलाप्रेमींची तृष्णा शमवून त्यांच्या वैचारिक सृजनशीलतेला चालना मिळत आहे.