
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘बिसारा लेडीज इक्वॅलिटी रन’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सराव शिबिरास उत्साहात सुरुवात झाली आहे. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे आयोजित या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५६ महिलांनी सहभाग नोंदवत धावण्याचा श्रीगणेशा केला. शहरातील कृष्णचंद्र सभागृहाशेजारील मोकळ्या मैदानावर सकाळी सहा वाजता या सराव सत्राला प्रारंभ झाला.

दि. १२ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘बिसारा लेडीज इक्वॅलिटी रन’ स्पर्धेसाठी प्रत्येक मंगळवार, गुरुवार व रविवारी सकाळी ६ ते ७ या वेळेत नि:शुल्क सराव सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. मंगळवार, ३ मार्च रोजी झालेल्या पहिल्या सत्रासाठी जळगावच्या महापौर दीपमाला काळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. स्वतः उत्कृष्ट धावपटू व सायकलपटू असलेल्या महापौरांनी महिलांचा उत्साह वाढवला.
कार्यक्रमाची सुरुवात वार्मअप व्यायामाने करण्यात आली. त्यानंतर दीपमाला काळे आणि लहान धावपटू अवनी मंगेश चंदन यांच्या हस्ते नारळ फोडून सराव सत्राचा विधिवत शुभारंभ करण्यात आला. असोसिएशनच्या नियमित महिला धावपटूंसोबत नवोदित महिलांनीही आत्मविश्वासाने धावण्यास सुरुवात केली. मैदानापासून डीआरएम कार्यालय, लाल चर्च, लोको शेड रोड असा सुमारे ३ किमीचा टप्पा पूर्ण करून पुन्हा मैदानावर परत येत सत्राची सांगता स्ट्रेचिंग व्यायामाने झाली. या रनचे शिस्तबद्ध नियमन प्रशांत वंजारी यांनी केले.
यावेळी डॉ. नीलिमा नेहेते व डॉ. चारुलता पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांचा सत्कार केला. उपस्थित मान्यवरांमध्ये उत्तम धावपटू संजय मोती यांचे स्वागत प्रा. प्रविण फालक यांनी केले. आपल्या मनोगतात दीपमाला काळे यांनी सलग सहाव्यांदा महिलांसाठी अशी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल असोसिएशनचे कौतुक केले. आपल्या फिटनेस प्रवासाच्या आठवणी सांगताना त्यांनी भुसावळच्या धावपटूंंसोबत बाहेरगावी मॅरेथॉन स्पर्धांतील अनुभवही शेअर केले आणि भविष्यातही या उपक्रमासाठी वेळ देण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रविण फालक होते, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रविण पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छोटू गवळी, प्रशांत चौधरी, मंगेश चंदन, प्रविण वारके, सुयश न्याती, संजय तिवारी व राजेंद्र घाटे यांचे सहकार्य लाभले.



