वावडदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदा येथील इंदिरा नगर परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून एका ५५ वर्षीय महिलेला केस ओढून मारहाण केल्याची आणि ओट्यावरून खाली ढकलून दुखापत केल्याची घटना सोमवारी १९ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चार सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील वावडदा गावातील बेबाबाई मधुकर धनगर (वय ५५) या आपल्या घराबाहेर उभ्या होत्या. त्यावेळी आरोपी रेणुका आनंदा बेलदार आणि रमेश बेलदार यांच्यात भांडण सुरू होते. या भांडणादरम्यान फिर्यादी बेबाबाई यांनी आपल्या स्वतःच्या मुलीला “घरामध्ये मर” (घरात जा) असे म्हटले. याचा राग मनात धरून आरोपींनी बेबाबाई यांच्यावर हल्ला केला. आरोपी रेणुका बेलदार हिने फिर्यादीचे केस ओढून त्यांना चापटांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी विकी आनंदा बेलदार याने फिर्यादीला ओट्यावरून खाली जोरात ढकलून दिले, ज्यामध्ये त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. यावेळी आरोपी आनंदा बेलदार, कैलास बेलदार आणि विजय बेलदार यांनी संगनमताने महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली. पोलिसांत धाव या घटनेनंतर जखमी बेबाबाई धनगर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.




