जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अयोध्या नगरात राहणाऱ्या तरूणाला पतंजली योग पीठ ट्रस्टमध्ये उपचार करून देत असल्याचे सांगून ५४ हजार ६०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवार ९ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता अज्ञात मोबाईल धारकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पंकज सुभाष काळे (वय-३६) रा. अयोध्या, नगर,जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचा खासगी व्यवसाय असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ते घरी असतांना त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. व सांगितले की, माझे पतंजली योग पीठ ट्रस्ट येथे ओळख असल्याने तिथे माझ्या माध्यमातून उपचार करून देतो असे बतावणी केली. त्यानंतर पंकज काळे यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी एकुण ५४ हजार ६०० रूपये ऑनलाईन मागून घेतले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पंकज काळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार ९ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत करीत आहे.