नवी दिल्ली । लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या कर्मचार्यांना तीन महिन्यांचा ५० टक्के पगार मिळणार असल्याचे वृत्त असून राज्य विमा महामंडळ (इएसआयसी) लागू असणार्यांना ही सुविधा मिळणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात लक्षावधी लोकांच्या नोकर्यांवर गदा आली आहे. या सर्वांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच महत्वाची घोषणा करण्याची शक्यता असून याबाबत टाईम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राने वृत्त दिले आहे. यानुसार, लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने अनेकांनी नोकर्या गमावल्या असून अर्थव्यवस्थेलाही याचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमिवर, कामगारांना आर्थिक मदत केली जावी अशी मागणी वारंवार होत होती. दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि नीती आयोगाने नियम शिथील करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, केंद्र सरकारच्या योजनेनुसार लॉकडाउन जाहीर झाल्यापासून म्हणजेच २४ मार्च ते ३१ डिसेंबपर्यंतच्या कालावधीत कर्मचारी तीन महिन्यांच्या (९० दिवस) ५० टक्के पगारावर दावा करण्यास पात्र असतील. मात्र यासाठी ते किमान दोन वर्षांसाठी (१ एप्रिल ते ३१ मार्च) कर्मचारी राज्य विमा योजनेशी जोडलेले असणं अनिवार्य आहे. याशिवाय १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत किमान ७८ दिवसांसाठी त्यांनी योगदान दिलेलं असंल पाहिजे.
आधी बेरोजगार झाल्यानंतर ९० दिवसांनंतर याचा फायदा घेतला जाऊ शकत होता. पण आता ही मर्यादा कमी करत ३० दिवसांवर आली आहे. कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली आहे. राज्य विमा महामंडळाचे तसंच भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य असणार्या व्ही राधाकृष्णन यांनी सरकारच्या या निर्णयामुळे ३० ते ३५ लाख कामगारांना फायदा मिळणार असून नोकरी गेलेल्यांना दिलासा मिळेल असं म्हटलं आहे.