जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे किरकोळ कारणावरून एका कुटुंबातील ५ जणांना लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड, वीट आणि कमरेच्या पट्ट्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवार २७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे रामदास जाधव हे आपल्या पत्नी कमलाबाई जाधव, मुलगा विलास जाधव, नरेश जाधव आणि सून वैशाली जाधव यांच्यासह वास्तव्याला आहे. दरम्यान गुरुवारी २७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता किरकोळ कारणावरून रामदास जाधव यांच्यासह त्यांच्या पत्नी, त्यांची दोन्ही मुले व सून यांना गावात राहणारे नवल गणपत चव्हाण, जगदीश गणपत चव्हाण, वनिता नवल चव्हाण, चेतन नवल चव्हाण, नयन नवल चव्हाण, गौरव जगदीश चव्हाण, तुकाराम चव्हाण, दिनेश चव्हाण, कालूसिंग चव्हाण, विकास चव्हाण, नरेश चव्हाण सर्व रा. रामपूर तांडा, स्वाती समाधान राठोड आणि रेणुका नरेश जाधव दोन्ही रा. रामदेववाडी ता. जळगाव यांनी काहीही कारण नसताना लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड, वीट आणि कमरेच्या पट्ट्यांनी ५ जणांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये रामदास जाधव यांच्यासह त्यांची पत्नी, दोन्ही मुले व सून हे गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेबाबत कमलबाई रामदास जाधव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सायंकाळी ६ वाजता मारहाण करणाऱ्या १३ जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहे.