भडगाव , पाचोऱ्यात ५ दिवसांचा जनता कर्फ्यू

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा व भडगाव तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने १५ ते १९ मेपर्यंत पाच दिवसांच्या जनता कर्फ्युचा निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी घेतला  आहे. कोरोना हद्दपार करण्यासाठी एकजूट दाखवावी  असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यासह पाचोरा – भडगावात तालुक्यात वाढलेली कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात यावी व तालुक्यातील कोरोनाची साखळी खंडित करता यावी यासाठी १५ ते २२ मेपर्यंत ७ दिवसांचा जनता कर्फ्यु पाळण्याचा एकमुखी निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला होता. मात्र तद्नंतर व्यापाऱ्यांनी किशोर पाटील यांना आधीपेक्षा रुग्ण संख्या नियंत्रणात येत असल्याने जनता कर्फ्युचा कालावधी कमी करण्याची विनंती केल्याने सर्व व्यापारी बांधवांच्या विनंतीला मान देत अखेर जनता कर्फ्यु दि. १५ ते २२ मे ऐवजी दि.१४ मे च्या रात्री बारा वाजेपासून ते दि. १९ मे च्या रात्री १२ वाजेपर्यंत पाच दिवसांचा जनता कर्फ्यु करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तरी या झालेल्या बदलाची सर्वांनी नोंद घेत जनता कर्फ्यु पाळत आपल्या परिसरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी एकजूट दाखवावी व जनता कर्फ्युचे पालन करावे असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे.

 

दरम्यान आधीच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरल्या प्रमाणे अत्यावश्यक सेवेतील केवळ मेडिकल पूर्णवेळ तर दुध डेअऱी या सकाळी ७ ते १० व संध्याकाळी ६ ते ९ या वेळात उघड्या ठेवता येणार आहेत तर कृषी केंद्र मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र इतर सर्व प्रकारची व्यापारी प्रतिष्ठाने ,किराणा दुकाने भाजीपाला संपूर्णपणे बंद ठेवण्याबाबत सहमती झाली आहे. तसेच  विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांविरुद्ध देखील दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व जनतेने या जनता कर्फ्यु मध्ये सहभागी होत आपण जबाबदार नागरिक आहोत हे सिद्ध करावे असे आवाहन सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमदार किशोर पाटील यांचेवतीने करण्यात आले आहे.

Protected Content